जाणून घ्या १०० टक्के नोकरी / व्यवसायाची हमी देणाऱ्या सृजनशील कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित असलेले -
ग्राफिक डिझाईनमधील करिअर.

प्रस्तावना : 

कल्पनांवर आधारित कला आणि कौशल्याच्या करिअरमध्ये अनेक क्षेत्रे येतात. त्यामध्ये प्रामुख्याने जाहिरात, प्रिंटिंग, पब्लिकेशन, पॅकेजिंग, फोटोग्राफी, वेब डिझाईन, ऍनिमेशन, फिल्म मेकिंग, सोशल मिडिया, ऑनलाईन मार्केटिंग आदी क्षेत्रांचा समावेश आहे. आणि या प्रत्येक क्षेत्रात ग्राफिक डिझाईनरची गरज असते. त्यामुळे ग्राफिक डिझाईनरसाठी करिअरचे अनेक दरवाजे नेहमीच उघडे असतात. म्हणूनच ग्राफिक डिझाईनमध्ये करिअरच्या जेवढ्या संधी उपलब्ध आहेत तेवढ्या इतर कोणत्याही क्षेत्रात नाहीत. या संधी आणखी वाढणारच आहेत कारण एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे – ग्राफिक डिझाईनर जे ग्राफिक डिझाईन बनवतो ते सारे सॉफ्ट कॉपीजमध्ये असते. आणि डिझाईनच्या त्या सॉफ्ट कॉपीज ईमेल किंवा वेब पोर्टलच्या माध्यमातून क्षणात जगाच्या पाठीवर कुठेही पाठवता येतात. रफ व्हिज्युअल्स दाखवता येतात. आणि पेमेंटही ऑनलाईन डायरेक्ट खात्यावर जमा होते. इंटरनेटमुळे सारे शक्य झाल्यामुळे घरात बसून नोकरी / व्यवसाय करणे अगदी सोपे झाले आहे. कोरोनाच्या निमित्ताने ऑनलाईनचे महत्व आणखीनच वाढले आहे. त्यामुळे ज्याला कलेची किंवा कला शिकण्याची आवड आहे त्याला घरात बसून काय करू? हा प्रश्न पडता कामा नये. यासाठी पहिली स्टेप काय? सुरुवात कुठून आणि कशी करायची? हा नेहमीच विचारला जाणारा एक प्रश्न असतो. एखाद्या करिअरमध्ये स्वतःला झोकून द्यायचं आणि त्यामध्ये यश मिळवायचं हे त्या करिअर क्षेत्राविषयी तुमच्या आवडीवर आणि नियमित अभ्यासावर अवलंबून आहे. ग्राफिक डिझाईनमधील करिअर हे सर्व क्षेत्र समावेशक आणि कल्पक बुद्धीला आव्हान देणारे आहे. एकदा शिकून आयुष्यभर नोकरी / व्यवसाय व्यवसाय करणे आता कोणत्याच क्षेत्रात शक्य नाही. तुम्ही कितीही शिकला असाल तर नियमित अभ्यास करून तुम्हाला अपडेट राहावे लागते तरच या व्यावसायिक स्पर्धेच्या जगात तुमचा टिकाव लागणार आहे. तुम्ही नोकरी करीत असला तरीही तुमच्या संबंधित क्षेत्रातील ज्ञानात तुम्ही स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. क्षेत्र कोणतेही असुदे तिथे कला, कल्पना आणि कौशल्याची गरज असतेच. पण ग्राफिक डिझाईनमध्ये याची गरज थोडी जास्तच असते. कारण ग्राफिक डिझाईनचा संबंध थेट व्यवसाय वृद्धीशी असतो. कारण प्रत्येक व्यवसाय / उद्योगाच्या जाहिरात, मार्केटिंगसाठी कल्पक डिझाईनची गरज असते, शिवाय पॅकेजिंग, पब्लिकेशनसारख्या इतर अनेक व्यावसायिक गरजांसाठीसुद्धा ग्राफिक डिझाईनची गरज असते. हे सारे तपशीलवार पाहण्याआधी ग्राफिक डिझाईन शिकायला सुरुवात कशी करता येईल, त्यामध्ये किमान किती गोष्टी शिकाव्या लागतात आणि त्या शिकण्याचा क्रम कसा असावा या विषयी मी सांगणार आहे. सुरुवातीला ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते पाहू. म्हणजे तुम्हाला या क्षेत्राची आवड असेल किंवा हे वाचून आवड निर्माण झाली तर पुढे वाचा. नाहीतर एखाद्या करिअर संबंधित विषयाचा तात्पुरता उत्साह काही कामाचा नसतो. करिअर विषयक अभ्यासाचा उत्साह नेहमी टिकला पाहिजे नव्हे तर तो हळू हळू वाढला पाहिजे. तरच करिअरमध्ये खरी गंमत आहे. नाहीतर पॅकेजकडे डोळा ठेऊन शिकणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मेताकुटीला येऊन गोळा बेरीज करून प्रोजेक्ट सबमिट केल्यानंतर मोठे पॅकेज मिळाल्याची स्वप्ने पडायला सुरुवात होते. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. असो. आपला विषय ग्राफिक डिझाईन आहे. आणि ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर करायचे असेल तर ग्राफिक डिझाईन म्हणजे काय असतं ते आधी समजून घेतलं पाहिजे. 

 ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? 

ग्राफिक डिझाईन ही संदेशवहनाची एक कला आहे. मग तो संदेश एखादे वाक्य किंवा एखादा पॅरेग्राफ असेल, त्यासोबत एखादे चित्र, फोटो किंवा विविध रंगातील आकार असतील. तो संदेश कोऱ्या कागदावर हाताने लिहिलेला असेल, रंगविलेला असेल किंवा कॉम्प्युटरवर तयार केलेला असेल. वर्तमानपत्रातील जाहिरात, पोस्टर, वेबसाईट, इनबॉक्समध्ये येऊन पडणारे ईमेल्स किंवा अगदी जवळचे उदाहरण द्यायचे झाले तर मोबाईलवर आलेला मेसेज किंवा व्हिडीओ म्हणजे हे सारे ग्राफिक डिझाईनचेच नमुने आहेत. थोडक्यात मजकूर, चित्र, फोटो, विविध रंगी आकार, म्युझिक आणि व्हिडीओ पैकी एक, दोन किंवा अनेकांचे मिश्रण करून केलेली जी रचना / कलाकृती असते त्या कलाकृतीला ग्राफिक डिझाईन म्हणतात. ग्राफिक डिझाईन एवढ्यावर थांबत नाही तर आपले दैनंदिन जीवन त्याने व्यापून टाकलेले असते. तुमच्या अवती भोवती जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला ग्राफिक डिझाईनच पाहायला मिळेल. त्याच्यावर आपली सहजच दृष्टी पडते आणि कळत नकळत तुमच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही ग्राफिक डिझाईनच्या सहवासात असता. तुम्ही कुठेही असा. ग्राफिक डिझाईन तुमचा पिच्छा सोडत नाही. सकाळी तुम्ही चहा पिता ती चहा पूड अगोदर ज्या बॉक्स किंवा पाऊच मध्ये असते तो बॉक्स किंवा पाऊच टाकून देण्याअगोदर नीट पहा. त्यावर प्रिंट झालेले डिझाईन हे ग्राफिक डिझाईन असते. असे विविध आकारातील असंख्य प्रॉडक्ट्स आणि त्यासाठी लागणारी विविध प्रकारची डिझाईन्स हे ग्राफिक डिझाईनचेच काम आहे. मार्केटमधील प्रॉडक्ट्सची संख्या पाहता ही प्रिंट पॅकेजिंग इंडस्ट्री किती मोठी असेल याची कल्पना करा. रोज नवे नवे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येत असतात, जुन्या प्रॉडक्ट्सची डिझाईन्स बदलायची असतात. त्यासाठी ग्राफिक डिझाईनर्सची आवश्यकता असते. 

चहा पीत पीत समोर वर्तमान पत्र असेल तर त्यामधील प्रत्येक बातमी, प्रत्येक जाहिरात म्हणजे ग्राफिक डिझाईन असते. नव्हे तर संपूर्ण वर्तमान पत्र हे ग्राफिक डिझाईनचे उत्तम उदाहरण आहे. जाहिरात क्षेत्र हे आणखी एक खूप मोठे क्षेत्र आहे, जिथे २४ तास कल्पक ग्राफिक डिझाईनर्सची गरज भासते.  या जाहिरात कलेचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. जसे ज्या असंख्य प्रॉडक्ट्सची पॅकेजिंग डिझाईन्स बनवावी लागतात तसे त्या प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीही कराव्या लागतात. त्या जाहिरातीची डिझाईन्स बनविणे हे पुन्हा ग्राफिक डिझाईनरचेच काम आहे. जाहिरातीचे अनेक प्रकार असतात म्हणजे जाहिरात डिझाईनच्या कामाची व्याप्ती किती मोठी असेल त्याची कल्पना करा. चहा, नाश्ता झाल्यावर पेपर बाजूला ठेऊन जेंव्हा तुम्ही बाहेर पडता तेंव्हा नकळत तुमची नजर रस्त्यावरील दुकानाचे बोर्ड्स, चौकातील इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आणि बिल्डिंगवरील होर्डिंग्सवर पडतच असेल. ते सारे ग्राफिक डिझाईनचेच प्रकार आहेत. ऑफिसमध्ये गेलात तर टेबलवरील स्टेशनरीमध्ये व्हिजिटिंग कार्ड्स, प्रॉडक्ट कॅटलॉग तसेच कॉम्प्युटर सुरु केल्यावर आलेले ईमेल्स, काहीतरी शोधण्यासाठी पाहत असलेल्या वेबसाईट्स, त्या वेबसाईटवरील बाजूला लक्ष वेधून घेणारी हलती बोलती बॅनर्स असे जे अनेक प्रकार तुम्ही रोजच पाहता, ते सारे ग्राफिक डिझाईन असते. घरी आल्यावर विरंगुळा म्हणून एखादी टीव्ही सिरीयल पाहत असाल तर ब्रेकमधील जाहिराती यासुद्धा ग्राफिक डिझाईनमध्येच येतात. टीव्ही ऍड्स बनविणे हे ग्राफिक डिझाईनरचेच काम आहे. रात्री जेवून झोपण्यापूर्वी जेंव्हा सहजच युट्युबवरील ज्ञानात भर घालणारे जे व्हिडीओज आपण पाहता ते ग्राफिक डिझाईनच असते. एवढेच कशाला युट्युब चॅनल बनवायचं कामही ग्राफिक डिझाईनरलाच करावं लागतं. 

सुट्टीच्या दिवशी एखाद्या मॉलमध्ये गेलात तर तिथे ग्राफिक डिझाईन्सचे असंख्य नमुने तुम्हाला पाहायला मिळतील. असंख्य प्रॉडक्टस, लटकवलेली डॅंगलर्स, चिटकविलेली पोस्टर्स, म्हणजे  सारे ग्राफिक डिझाईनच असते. प्रासंगिक निमंत्रण कार्ड्स, लग्न पत्रिका, आयकार्ड, साईन बोर्ड, आदी अनेक प्रकारची डिझाईन्स ग्राफिक डिझाईनरलाच करावी लागतात. 

फोटोग्राफी :
फोटोग्राफी हा ग्राफिक डिझाईनचा एक प्रमुख भाग असला तरी ते स्वतंत्र करिअर क्षेत्रही आहे. फंक्शन फोटोग्राफी, मॉडेलिंग फोटोग्राफी, टेबल टॉप, इंडस्ट्रिअल फोटोग्राफी असे अनेक प्रकार यामध्ये येतात. फोटो एडिटिंग मिक्सिंग करून लग्नाचे अल्बम डिझाईन करणे हा खूप मोठा व्यवसाय आहे. हल्ली तर प्रिवेंडिंग फोटोग्रा[फीचे फॅड आल्याने फोटोग्राफीच्या कामात आणखीनच भर पडली आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ टाकण्याची तर चढाओढच लागली आहे. त्यासाठी स्पेशल काहीतरी बनविण्यासाठी ग्राफिक डिझाईनरच लागतो. व्यावसायिक स्पर्धेच्या जगात जो तो आजकाल ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग करतो. यासाठी सोशल नेटवर्क साईटवर बिझनेस प्रमोट करण्यासाठी अगोदर डिझाईन्स बनवावी लागतात. पुन्हा त्यासाठी ग्राफिक डिझाईनरच लागतो.  ग्राफिक डिझाईनमधील  कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. सर्वच्या सर्व मला एका वेळी सांगणे शक्य नाही. एवढ्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल कि  ग्राफिक डिझाईन इतकी करिअर संधी इतर कोणत्याही क्षेत्रात नाही. 

जाहिरात :
ग्राफिक डिझाईन ही जाहिरात कला आहे. समोरच्याला मोहात पाडून त्याचे मत आणि मन-परिवर्तन करण्याची कला आहे. एखादा प्रॉडक्ट विकत घेताना तुम्ही शंभर वेळा विचार करता. एखादा प्रॉडक्ट कधी कधी तुम्ही पटकन विकत घेता. असे का होते. मला जे म्हणायचे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्याला पटले पाहिजे, आणि त्याच्याकडून मला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. इथे व्यापारी, उद्योजक त्याच्या उत्पादनाबद्दल त्याच्या ग्राहकाला काहीतरी पटवून देत असतो. प्रॉडक्ट कितीही चांगला असला तरी जाहिरात आणि मार्केटिंग केल्याशिवाय तो खपत नाही. जाहिरात आणि मार्केटिंग हे ग्राफिक डिझाईन शिवाय होऊच शकत नाही. म्हणून ग्राफिक डिझाईन खूप महत्वाचे आहे. ग्राफिक डिझाईन म्हणजे दुसऱ्याला पटवायची कला आहे, असे म्हटले तरी चालेल. कसे पटवायचे ? कोणत्या मार्गाने पटवायचे ? कसे पटवायचे? कशासाठी पटवायचे ? हा सारा विचार आणि अभ्यास ग्राफिक डिझाईन करण्यापूर्वी करावा लागतो. माझा प्रॉडक्ट चांगला कसा आहे, हे व्यापारी ग्राहकाला पटवून सांगतो. त्याला तो प्रॉडक्ट विकत घ्यावयास प्रवृत्त करतो. हे सारे तो व्यापारी जाहिरातीच्या ज्या माध्यमातून सांगतो ते म्हणजे ग्राफिक डिझाईन असते. एखादा प्रॉडक्ट आणि तो प्रॉडक्ट विकत घेणारा ग्राहक यांच्यामध्ये ज्या माध्यमातून संवाद होतो ते ग्राफिक डिझाईन असते. म्हणूनच ग्राफिक डिझाईनला कम्युनिकेशन आर्ट असेही म्हणतात. व्यापाराशी संबंध असल्याने ग्राफिक डिझाईनला कमर्शिअल आर्ट असेही म्हणतात. जाहिरातीसाठी मनातील एखादी कल्पना दृश्य रूपात आणली जाते म्हणून हिला व्हिज्युअल आर्ट असेही म्हणतात. व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार, उत्पादक किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर या सर्वाना ग्राफिक डिझाईनची गरज असते. अशी डिझाईन्स हे लोक ज्याच्याकडून करून घेतात तो ग्राफिक डिझाईनर. त्याला कमर्शिअल आर्टिस्ट असेही म्हणतात. 

प्रिंट पॅकेजिंग / प्रिंट पब्लिकेशन :
ग्राफिक डिझाईनची अत्यंत गरज असलेल्या प्रिंट पॅकेजिंग आणि प्रिंट पब्लिकेशन ह्या खूप मोठ्या दोन इंडस्टीज आहेत. जिथे ग्राफिक डिझाईनरची गरज असते. पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्रं हळूहळू ई कॉपीच्या माध्यमातून उपलब्ध होऊ लागली आहेत. पण तरीही ह्यांच्या हार्ड कॉपीचं महत्व अजूनही कमी झालेलं नाही. प्रिंट पब्लिकेशनची जरी ई-आवृत्ती निघाली तरी त्याला डिझाईन हे करावेच लागते. आता प्रिंट पॅकेजिंग प्रॉडक्टचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल कि प्रोडक्टची ई कॉपी शक्यच नाही. प्रॉडक्टसाठी  बॉक्स किंवा पाऊच लागणारच आहे किंवा त्याचे लेबल हे प्रिंट करूनच प्रॉडक्ट ला चिटकवावे लागणार आहे. त्यामुळे प्रिंटिंग इंडस्ट्री कधी संपणारच नाही. थोडक्यात, प्रिंट पब्लिकेशनची सॉफ्ट कॉपी असुदे किंवा हार्ड कॉपी असुदे डिझाईन हे करावेच लागणार आहे. आणि  पॅकेजिंग ही तर न संपणारी गरज आहे. त्यामुळे मीडिया कितीही बदलला तरी ग्राफिक डिझाईनरचे महत्व आणि त्याची गरज कधीच संपणार नाही. म्हणूनच ग्राफिक डिझाईनमधील करिअरला मरण नाही.

ग्राफिक डिझाईनची व्याप्ती पाहिल्यानंतर ग्राफिक डिझाईन म्हणजे खूप वेगळं आणि अवघड आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर अगोदर मनातुन ते काढून टाका. आपल्या अवती भवती ग्राफिक डिझाईन असते हे वर मी सुरुवातीलाच सांगितले आहे, त्यावरून ग्राफिक डिझाईनबद्दल थोडीशी कल्पना तुम्हाला आलीच असेल. तसे पहिले तर ग्राफिक डिझाईन आपण दैनंदिन जीवनात नेहमीच जगत असतो. मुळात प्रत्येकजण ग्राफिक डिझाईनरच  असतो. कसा ते पाहा. 

कोणत्या पॅन्टवर कोणता शर्ट कि टीशर्ट घालायचा, बूट कि चप्पल, हेअर स्टाईल कशी पाहिजे? मुलींच्या बाबतीतही ड्रेस कोणता, चप्पल, नेलपेंटपासून ते बिंदीपर्यंत मॅचिंग कलर्सचा जो त्या विचार करतात ते ग्राफिक डिझाईन असते. कारण कलर्स हा ग्राफिक डिझाईनचा एक महत्वाचा टॉपिक आहे. लहान मुलांना विविध रंगीत खेळण्यांशी खेळायला आवडते. त्याच्या हातात पेन्सिल किंवा खडू द्या. ते दिसेल तिथे रेघोट्या मारते. म्हणजे आपण त्याला स्केचिंग म्हणणार आहोत. म्हणजे रंगांची आवड आणि रेघोट्या मारणे ही जन्मजात वृत्ती असते. इथे  ग्राफिक डिझाईनमध्ये वेगळं काहीच नसते. स्केचिंग आणि कलर्सचा खूप अभ्यास ग्राफिक डिझाईनमध्ये असतो.  तात्पर्य हे कि रंगांशी खेळणं आणि रेघोट्या मारणं हे ग्राफिक डिझाईन शिकताना नवीन नसतं. पण तरीही जाणीवपूर्वक ह्या गोष्टी ग्राफिक डिझाईनमध्ये आपणास शिकाव्या लागतात. कोणत्याही कामातला नीटनेटकेपणा म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. 

मानस आणि तर्क शास्त्र :
व्यावहारिक कोणत्याही कृतीपाठीमागे जसा एखादा हेतू लपलेला असतो, त्याचप्रमाणे ग्राफिक डिझाईनसुद्धा एखादा हेतू ठेऊनच केले जाते. ग्राफिक डिझाईनचा परिणाम पाहणाऱ्याच्या मनावर कसा व्हायला पाहिजे हा विचार डिझाईनच्या अगोदर करावा लागतो. म्हणजे ग्राहकाचे मानसशास्त्र विचारात घेऊन तर्क करावा लागतो. आणि त्यानुसार डिझाईन बनवावे लागते. हेतू साध्य होतो कि नाही हे नंतर कळतं. उत्तम डिझाईन करूनसुद्धा प्रॉडक्टची विक्री अपेक्षेप्रमाणे होत नाही. तर कधी दोन ओळीची साधी जाहिरात खूप फायदा करून देते. 

सृजनशीलता : Creativity
ग्राफिक डिझाईनसाठी सृजनशीलतेची गरज असते. सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे निर्माण करणारी कल्पना.  ग्राफिक डिझाईनमध्ये करिअरला संधी आहे, पॅकेज चांगलं मिळतं म्हणून शिकायचं नाही. कलेची आवड असणं महत्वाचं. एखादी गोष्ट आवडली तरच पुढे जाण्यात अर्थ आहे. ग्राफिक डिझाईनमध्ये खूप गमती जमती असतात. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचं चॅलेंज असतं. एकदा का तुमच्या मनात ग्राफिक डिझाईनची आवड निर्माण झाली कि पुढचा सारा प्रवास सोपाच आहे. ग्राफिक डिझाईनचे विश्व खूप मोठे आहे. किती शिकलात तरी पुढे शिकण्यासाठी खूप काही आहे.  ग्राफिक डिझाईमध्ये रोज कितीही नवी टेक्नॉलॉजी आली तरी ग्राफिक डिझाईनचा बेस समजला असेल तर टेक्नॉलॉजी शिकणं अजिबात अवघड नाही. ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर तुम्ही जेवढे कराल तेवढे कमीच आहे. 

चित्रकला :
ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी चित्रकला चांगली पाहिजे, हे खरं असले तरी ग्राफिक डिझाईनवर चित्रकलेचा  प्रभाव २०-२५ वर्षांपूर्वी खूप होता. कारण त्यावेळी संपूर्ण डिझाईन, आर्टवर्क, फोटो फिनिशिंग हे हाताने करायला लागायचे. प्रत्यक्ष रंग घेऊन ब्रशने चित्र रंगवायचे होते. ते स्किल हातामध्ये असणे त्यावेळी महत्वाचे होते. आज चित्रकलेचे महत्व कमी झालंय असे मुळीच नाही, फायनल डिझाईन, आर्टवर्क, फोटोफिनिशिंग आता कॉम्प्युटरवर होत असले तरी ते बनवताना चित्रकलेमुळे निर्माण झालेल्या कल्पक दृष्टीचा खूप उपयोग होतो. ग्राफिक डिझाईनचे बेसिक स्केच करण्यासाठी चित्रकलेचा उपयोग होतो. आणि हे बेसिक स्केच करणाऱ्यालाच खूप महत्व असते. तुमची चित्रकला बेताची किंवा उत्तम कशीही असुदे, पण आज कॉम्प्युटरच्या युगातही ग्राफिक डिझाईनचे पहिले टूल स्केच पॅड आणि पेन्सिल हेच आहे. आणि ते पुढे कधीही बदलणार नाही. याला कारण जेवढ्या सहजपणे विचार करीत करीत आपण पेन्सिलने कागदावर रेखाटन करतो, ती नैसर्गिक सहजता लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर कधीच येत नाही. विचार करीत करीत कागदावर अशा  रेघोट्या मारतच  डिझाईनसाठी एखादी भन्नाट कल्पना सुचते. बाकी नंतर सारे कॉम्प्युटरवरच करायचे असते. डिझाईनची कल्पना सुचणे म्हणजे ८० टक्के डिझाईन पूर्ण झाल्यासारखे असते. अर्थात विचार कसा करायचा, कल्पना कशी सुचते आणि स्केचिंग हा ग्राफिक डिझाईनचा बेसिक पण अत्यंत महत्वाचा अभ्यास आहे. हा व  यासाठी इतर काही संलग्न विषयांचा अभ्यास करावा लागतो. ज्याचा कलेची दृष्टी निर्माण होण्याकरिता खूपच उपयोग होतो. ज्याच्याकडे अशी कलेची दृष्टी आणि कल्पकता आहेत तो चांगला ग्राफिक डिझाईनर नक्कीच बनतो.    

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय, आणि ग्राफिक डिझाईन शिकल्यावर तुम्हाला कोणकोणती डिझाईन्स बनवायची आहेत, याची कल्पना तुम्हाला आली असेल तर आपण आता थोडे पुढे जावून ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी सुरुवात कशी करायची ते पाहू. 

शिकण्याचा क्रम :
ग्राफिक डिझाईन शिकण्याचा क्रम आणि प्रत्यक्षात डिझाईन बनविण्याचा क्रम परस्पर विरोधी आहेत. ते कसं पाहा. प्रत्यक्षात जेंव्हा तुम्हाला ग्राफिक डिझाईन बनवायचं असतं तेंव्हा प्रथम विचार करावा लागतो, त्यानंतर एखादी कल्पना सुचावी  लागते, आणि त्यानुसार डिझाइनमध्ये वापरण्यासाठी रॉ मटेरियल गोळा करायचे असते. जसे फोटो मिळवणे, मजकूर लिहिणे, त्यानंतर कच्चे स्केच बनवायचं म्हणजे साधारण गोळा केलेल्या रॉ मटेरिअलची मांडणी / रचना कशी असावी हे ठरवायचं. त्यानंतर विषयानुरूप रंगसंगतीचा विचार करायचा आणि सर्वात शेवटी  कॉम्प्युटर सुरु करून डिझाईनला सुरुवात करायची. म्हणजे बघा विषयानुरूप ग्राफिक डिझाईनची संकल्पना फायनल झाली कि शेवटी कॉम्प्युटरवर डिझाईन सुरु करायचं असतं. ग्राफिक डिझाईनसाठी एखादी कल्पना कधीकधी पटकन सुचते तर कधीकधी ती सुचायला काही तास, दिवस किंवा काही आठवडेही लागतात. ग्राफिक डिझाईनची हे जे कल्पना सुचणं आहे ते खरं ग्राफिक डिझाईन आहे. तिथून पुढे कॉम्प्युटरवर जे करायचं असतं, सुचलेली एखादी कल्पना दृष्य रूपात आणायची असते त्यासाठी कोरल ड्रॉ, इलस्ट्रेटर, फोटोशॉप, इन डिझाईनसारखी सॉफ्टवेअर्स शिकावी लागतात. कल्पना सुचते कशी हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी काही सवयी लावून घ्यायच्या असतात त्याबद्दल मी पुढे लिहिलेच आहे.  

सॉफ्टवेअर्स : व्हेक्टर आणि रास्टर :
सर्वात प्रथम हे समजून घ्या कि ग्राफिक डिझाईनमध्ये फक्त दोनच प्रकारचे ग्राफिक ऑब्जेक्ट असतात एक व्हेक्टर ग्राफिक ऑब्जेक्ट आणि दुसरा रास्टर ग्राफिक ऑब्जेक्ट. ह्या दोन ग्राफिक ऑब्जेक्टससाठी दोन वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरतात, मुख्यत्वे इलस्ट्रेटर किंवा कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर व्हेक्टर ग्राफिक ड्रॉईंगसाठी आणि फोटोशॉप हे सॉफ्टवेअर रास्टर ग्राफिकसाठी वापरतात. व्हेक्टर आणि रास्टर ऑब्जेक्टस  मिळून ग्राफिक डिझाईन बनत असल्यामुळे एकाच डिझाईनसाठी किमान ही दोन सॉफ्टवेअर्स वापरावीच लागतात. त्यासाठी किमान ही दोन सॉफ्टवेअर्स सुरुवातीला शिकायलाच हवीत. त्यानंतर गरजेनुसार इलस्ट्रेटर, इन डिझाईन, स्केच, पेंटर तसेच ऑडिओ / व्हिडीओ एडिटिंग, वेबसाठी HTML, CSS, Javascript किंवा वर्डप्रेस सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही खूप काही शिकू शकता.  या सर्व अभ्यासविषयांचा उपयोग अर्थातच सोशल नेटवर्किंग आणि डिजिटल मार्केटिंगसाठीही होतो. 

ही झाली सुरुवात. नियमित सराव करून यामध्ये प्राविण्य मिळवता येते. हे सर्व करीत असताना येणाऱ्या तुमच्या कोणत्याही शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही आहोतच. एवढ्यावर तुमची नोकरी / व्यवसाय सुरु होतो पण आणखी रुबाबात नोकरी मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी थोडं अधिक शिकून तुमच्या नोकरी/व्यवसायाच्या सीमा वाढवू शकता. त्यासाठी ग्राफिक डिझाईनचा बेस असलेल्या आणखी काही गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. त्यामध्ये वेब डिझाईन, ब्लॉगिंग, ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, सोशल मीडिया, ऑडिओ / व्हिडीओ व्हिज्युअल्स आदी विषयांचा समावेश आहे. नोकरीमध्ये तुमचे महत्व वाढविण्यासाठी, तुमच्या व्यवसायाचे अस्तित्व टिकविण्यासाठी तसेच तुमच्या कस्टमरच्या व्यवसायवृद्धीसाठी ह्या गोष्टी शिकायलाच हव्यात. म्हणून पुढे जाऊन ग्राफिक डिझाईनरला आणखी काय शिकायला हवं ते पाहू.  

वेबसाईट बनविणे :
स्टॅटिक आणि डायनॅमिक वेबसाईट बनविता येणे हा एक अत्यंत महत्वाचा अभ्यास विषय आहे. वर्षानुवर्षे नुसत्या  कोडिंगमध्ये डोके फोडून घेण्यापेक्षा थोड्या तार्किक अभ्यासाने वर्डप्रेस सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रोफेशनल वेबसाईट कशी बनवायची हे एक स्किल आहे. सेल्फ स्टडी केलेल्या विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता डिग्री करूनही विद्यार्थी  स्टार्ट टू एन्ड साधी स्टॅटिक वेबसाईट  बनवू शकत नाही. हि आजची कटू स्थिती आहे. कारणे अनेक असतील पण ग्राफिक डिझाईनचे अज्ञान हे एक महत्वाचे कारण आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणत्याही फिल्ड मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला त्याची  ओळख बनविण्यासाठी वेब ग्राफिक्सची गरज आहे. आणि नोकरी / व्यवसायासाठी ही ऑनलाईन ओळख अत्यंत महत्वाची आहे. म्हणून नोकरी व्यवसायाच्या भाऊगर्दीत स्वतःला प्रकट करण्यासाठी तुमचे ऑनलाईन अस्तित्व असणे ही काळाची गरज आहे. हे ऑनलाईन अस्तित्वा निर्माण करण्यासाठी स्टार्ट टू एन्ड म्हणजे डोमेन रजिस्ट्रेशनपासून ते होस्टिंगपर्यंतचे ज्ञान असणे गरजेचे आहे. यासाठी वेब ग्राफिक डिझाईनसह  आणखी वेगळा अभ्यास करावा लागतो. 

ब्लॉगिंग :
केवळ नोकरी / व्यवसायातच नव्हे, तर शिकत असतानाच स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःचे प्रमोशन करण्याची गरज असते. आणि त्यासाठी ब्लॉगिंगची खूप मोठी मदत होते. ज्याचा उपयोग तुमचे ऑनलाईन प्रोफाईल स्ट्रॉंग बनण्यासाठी होतो. परफेक्ट ऑनलाईन प्रोफाईल हे कागदी सर्टिफिकेटच्या गुंडाळीपेक्षा खूप मोलाचे आणि नोकरी मिळण्यासाठी किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी उपयुक्त असते. पण हे दुसर्याकडून प्रोजेक्ट करून सबमिट करण्याइतके सोपे मुळीच नसते. त्यासाठी तुम्ही जे शिकत असता त्याचा किंवा संबंधीत तुमच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास असावा लागतो. ब्लॉगिंग हा आमच्या अभ्यासक्रमातील एक महत्वाचा विषय आहे. 

सोशल नेटवर्किंग :
फेसबुक, ट्विटर, युट्युब, इंस्टाग्राम, लिंक्ड इन सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर नेहमी लुडबुड करून लोकांच्या नजरेत राहण्यासाठी स्वतःला प्रमोट करण्याचा नियमित प्रयत्न करायला हवा. त्यामुळे तुम्ही, तुमचे काम, तुमचे विचार, तुमचा अभ्यास याची जगाला ओळख होते. पर्यायाने नोकरी मिळण्यासाठी तसेच स्वतःच्या व्यवसायातही ही अशी ऑनलाईन लुडबुड खूप उपयोगाची आहे. फेसबुकवर स्वतःचे नुसते फोट अपलोड करून बिनकामाची वाहवा मिळविण्यापेक्षा तुमच्या अभ्यासासंबंधित एखादे वैचारिक पेज तयार करून ते पब्लिश करावे. आणि नियमित अपडेट करीत जावे. म्हणजे लोकांना तुमच्या ज्ञानाचे दर्शन घडेल. साहजिकच तुमची मार्केट व्हॅल्यू वाढेल. जिचा उपयोग नोकरी मिळण्यासाठी / स्वतःच्या व्यवसायासाठी नक्कीच होतो. हे सारे आम्ही आमच्या ऍडव्हान्स अभ्यासक्रमात घेतले आहे. 

सोशल नेटवर्किंगमध्ये फुकटात स्वतःचे व्हिडीओ चॅनल सुरु करण्यासाठी युट्युबचा प्लॅटफॉर्म आहे. युट्युबवर उपयोगाचे, बिनउपयोगाचे अनेक प्रकारचे व्हिडीओज असतात. ते फक्त पाहण्यात वेळ घालविण्यापेक्षा तुम्ही तुमचे फ्रीमध्ये स्वतःचे एक युट्युब चॅनल तयार करू शकता. आणि त्याद्वारे तुमचा अभ्यास, तुमची कला, तुमचे कौशल्य जगाला दाखवू शकता. त्यामुळे साहजिकच तुमची सोशल व्हॅल्यू वाढणार आहे. आणि अर्थातच त्याचा उपयोग तुमच्या नोकरी / व्यवसायासाठी होणार आहे. लिंक्ड इन, ट्विटर, इंस्टाग्राम मध्येही स्वतःची ओळख दाखवून देण्यासाठी खूप संधी आहेत. स्वतःला प्रेझेंट करणं हे आजच्या इतकं सोपं पूर्वी कधीच नव्हतं. त्यामुळे या संधीचा फायदा घ्यायला शिका. त्यासाठी जे शिकायला पाहिजे ते सारे शिकवायला आम्ही तयारच आहोत. एखादा व्हिडीओ बनवायचा असेल तर स्क्रिप्ट तयार करणे, स्टोरीबोर्ड तयार करणे, त्याप्रमाणे व्हिडीओ शूटिंग, अनिमेशन करणे, व्हिडीओ एडिटिंग, डबिंग करणे, व्हॉइस ओव्हर रेकॉर्डिंग, साऊंड एडिटिंग या साऱ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. हे सारे एकत्र करून एक फायनल व्हिडीओ बनविणे म्हणजे ती एक ग्राफिक कलाकृतीच असते. व्हिडीओ एडिटिंगची बरीच सॉफ्टवेअर्स नेटवर फ्री मिळतात. पण त्याचा उपयोग करून तुमचे कौशल्य दाखविण्याची तुमची इच्छा हवी. तसे प्रयत्न हवेत. नवनवीन शिकण्याची आवड असायला हवी.
सर्टिफिकेटच्या सुरळ्या घेऊन नोकरीसाठी उन्हातान्हात रांगेत उभे राहण्याऐवजी कंपन्यांनी तुमचा ऑनलाईन पोर्टफोलिओ पाहून नोकरी देतो म्हणून तुमच्याकडे यावे असे वाटत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजेत. आणि हे सारे आम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेतो. 

ग्राफिक डिझाईनरच्या सहा सवयी :
ग्राफिक डिझाईनमधील करिअर हे पूर्णतः कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित आहे. दररोज काहीतरी नवीन शिकविणारं आणि दररोज काहीतरी नवीन निर्माण करायला लावणारं आहे. ग्राफिक डिझाईनमधील करिअरमध्ये  रोज तेच तेच नसतं. त्यामुळे नाविन्याची आवड असणाऱ्यांना कधी कंटाळा येत नाही. ग्राफिक डिझाईनसाठी सॉफ्टवेअर शिकणं ही साधी गोष्ट आहे पण कला, कल्पना  आणि कौशल्य प्राप्त करून ग्राफिक डिझाईनमध्ये करिअरला सुरुवात करण्यासाठी किंबहुना करिअर सुरु झाल्यानंतरही काही सवयी तुम्हाला लावून घेतल्या पाहिजेत. जे समोर दिसतं ते पाहून, म्हणजे पुस्तक वाचून, पाठांतर करून मेरिटमध्ये येणारे ढिगाने आहेत. पण ग्राफिक डिझाईन हे  जे दिसतं त्याच्या पलीकडील पाहून शिकावे लागते. त्यासाठी ग्राफिक डिझाईन ज्या सहा मूलभूत गोष्टींवर आधारित आहे. त्या गोष्टी शिकून आचरणात आणल्या पाहिजेत. ह्या सहा गोष्टी म्हणजे हे सहा मानवी गुणधर्म आहेत यालाच आपण मानवी सवयी म्हणू शकतो. ह्या सहा सवयी कोणत्या ते जाणून घ्या. ग्राफिक डिझाईनर बनण्यासाठी या सहा सवयी असल्या पाहिजेत, नव्हे तर त्या जाणीवपूर्वक लावून घेतल्या पाहिजेत.  

१. निरिक्षण (Observation) :
ग्राफिक डिझाईनमध्ये निरीक्षणाला खूप महत्व आहे. पण समोर जे दिसतं ते नुसतं पाहणं म्हणजे निरीक्षण नव्हे. समोर जे दिसतं, जे घडतं त्याचं बारकाईनं निरीक्षण करून जे तर्क / वितर्क निघतात त्याचा ग्राफिक डिझाईनमध्ये वापर करता येतो. आज केलेल्या निरीक्षणाचा आजच उपयोग होईल असे मुळीच नाही पण पुढे कधी संबंधित ग्राफिक डिझाईनचा विषय आला जी तुमच्या जाणिवेत / नेणिवेत असणारे हे निरीक्षण जागे होतेच. आणि संबंधित ग्राफिक डिझाईनची एखादी भन्नाट कल्पना सुचू शकते. डिझाईनसाठी लागणारी कल्पना कुठे आकाशातून पडत नाही तर तिचा उगम हा निरीक्षणातून मिळालेल्या अनुभवातूनच होतो. जाणिवेत किंवा नेणिवेत साठलेल्या निरीक्षणातूनच होतो. म्हणून ग्राफिक डिझाईनमध्ये सूक्ष्म निरीक्षणाला खूप महत्व आहे. निरीक्षण कुणीही करू शकतं. त्यात अवघड काहीच नाही. सुरुवातीला जाणीवपूर्वक निरीक्षण करा नंतर हळू हळू त्याची सवय होईल आणि एकदा सवय झाली कि ते नित्याचं होईल. हे निरीक्षण म्हणजे ग्राफिक डिझाईनचे न दिसणारे रॉ मटेरियल असते. 

२. विचार करणे (Thinking) :
विचार करणे ही ग्राफिक डिझाईनची पहिली स्टेप आहे. विचार करणे ही जन्मजात मानवी सहज वृत्ती आहे, पण ग्राफिक डिझाईनसाठी जाणीवपूर्वक विचार करावा लागतो. ग्राफिक डिझाईन ही एक वैचारिक प्रक्रिया आहे, त्यामुळे पुन्हा मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या दोन विषयांचा अभ्यास करावा लागतो. ग्राफिक डिझाईन हे अनुमानाचे शास्त्र आहे, अनुमानानुसार येणाऱ्या किंवा न येणाऱ्या परिणामाचे शास्त्र आहे. एखादे अनुमान काढण्यासाठी उलट सुलट सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. कोणत्याही प्रॉडक्ट किंवा सेवेची जाहिरात ही सारासार विचार करूनच बनविलेली असते. तेंव्हा विषय कोणताही असो, त्या विषयावर जाणीवपूर्वक विचार करायची सवय लावून घेतली पाहिजे. 

३. लिहिणे (Writing) :
लिहिणे ही एक कला आहे. म्हणून लेखक हा सुद्धा एक कलाकार असतो. ग्राफिक डिझाईनमध्ये लिखानाला खूप महत्व आहे. ग्राफिक डिझाईनमध्ये कमी शब्दांची अर्थपूर्ण रचना करावी लागते. त्यामुळे ग्राफिक डिझाइनमध्ये तुम्हाला जे सांगायचे आहे नेमके तेच समोरच्याला समजले पाहिजे. निरीक्षणातून आलेला अनुभव आणि विचार करून काढलेला निष्कर्ष एखाद्या ग्राफिक डिझाईनला जोडून विषयाचे महत्व पटवून देण्यासाठी जी शब्द रचना करावी लागते त्याला कॉपी रायटिंग असे म्हणतात.  असं ग्राफिक डिझाईनसाठी कॉपी रायटिंग करण्यासाठी नियमित लिखाणाची सवय असावी लागते.  कोणताही विषय घेऊन दिवसातून एक तास तरी लिखाणाची सवय करून घ्यायला हवी. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जे झालं ते जरी लिहिलं तरी तुम्हाला लिखाणाची सवय लागण्यास पुरेसं होईल. लिखाणाची आवड निर्माण झाल्यानंतर हळू हळू ग्राफिक डिझाईनच्या विषयानुरूप लिहिणं सोपं वाटेल. तात्पर्य ग्राफिक डिझाईनसाठी लिहिण्याची सवय असायलाच हवी.

४. रेखाटने: (Sketching) :
चित्रकला हा ग्राफिक डिझाईनमधील एक महत्वाचा विषय आहे. विषयानुरूप ग्राफिक डिझाईनसाठी एखादे चित्र ड्रॉ किंवा पेंट करावे लागते. त्याला इलस्ट्रेशन म्हणतात. ग्राफिक डिझाईनमध्ये कॅलिग्राफी करावी लागते. कॅलिग्राफी हासुद्धा एक स्वतंत्र विषय आहे.  ग्राफिक डिझाईनमध्ये वेगळेपण आणण्यासाठी अशा गोष्टींची  असते. त्यासाठी तुम्ही शंभर टक्के आर्टिस्ट असायला पाहिजे असे नाही. पण आर्टिस्टिक दृष्टी निर्माण होण्यासाठी स्केचेस करण्याची खूप गरज आहे. फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअरमध्ये हल्ली फोटोवरून असे पेंटिंगचे इफेक्ट्स बनविता येतात. कॅलिग्राफी केल्यासारखे वाटणारे रेडिमेड फॉन्ट्सही उपलब्ध आहेत. पण तरीही ही डिजिटल आर्ट मॅन्युअल आर्टची जागा घेऊ शकत आहे. यासाठी नियमित स्केचिस करण्यासही गरज असते. ग्राफिक डिझाईन बनविण्यापूर्वी थम्ब स्केचिस बनविण्यासाठीही स्केचिंगचा उपयोग होतो. रोज निदान एखादा ऑब्जेक्ट समोर ठेऊन त्याचे स्केच करण्याचा सराव करा. अशाने वास्तूचे प्रमाण समजण्यास मदत होते. कोणत्याही वस्तूकडे बारकाईने पाहण्याची सवय लागते. आणि एक आर्टिस्टिक दृष्टी तयार होण्यास मदत होते. 

५. ऐकणे (To Listen) :
ग्राफिक डिझाईनमध्ये वैयक्तिक मतापेक्षा सार्वजनिक मताला अधिक महत्व असते. म्हणून विषयानुरूप पुढच्याला काय म्हणायचे आहे? त्याची काय अपेक्षा आहे  किंवा अनेकांना संबंधित विषयाबद्दल काय वाटते किंवा त्यांची मते काय आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. तुम्ही जे ऐकता ते तुमच्या ग्राफिक डिझाईनचे रॉ मटेरियल असते. तुम्ही जे ऐकता ते गृहीत धरून त्यानुसार तुम्हाला विचार करून संबंधित ग्राफिक डिझाईन बनवावे लागते. म्हणूनच तर रफ व्हिज्युअल्स तयार झाल्यानंतरही त्यामधून एखादे डिझाईन फायनल कारण्याआधी ती रफ व्हिज्युअल्स अनेकांना दाखवून त्याची मते ऐकली जातात.  ऐकणे ही जरी नैसर्गिक गोष्ट असली तरी जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐकण्याची सवय करून घेणं हे ग्राफिक डिझाईनच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. 

६. काल्पनिक दृश्ये पाहणे (Imagination) :
वरील पाच सवयींचा परिपाक एखादी भन्नाट कल्पना सुचण्यात होतो. डोक्यात काल्पनिक दृष्ये  तयार होण्यात होतो. किंबहुना तशी दृश्ये पाहण्याची सवय तुम्हाला करून घ्यायला हवी. कल्पना करणे ही सुद्धा एक नैसर्गिक गोष्ट आहे. ग्राफिक डिझाईन करण्यासाठी एखादी कल्पना सुचावी लागते असे जे म्हणतात ते हेच. कल्पना सुचल्यानंतर तुम्ही जे डिझाईन बनवत आहात ते कसे दिसायला हवे त्याच्या प्रतिमा दिसू लागतात. सारांश डिझाईनसाठी एखादी कल्पना सुचली कि ८० टक्के डिझाईन झाल्यासारखे असते. त्यानंतर तुमची सृजनशीलता जागी होते. सहजच तुमचा हात पेन्सिलकडे जातो आणि कल्पनेतील दृष्यांची स्केचेस सुरु होतात. डिझाईनमधील मजकुर लिहायला सुरु होते. रंगसंगती ठरवली जाते. डिझाईनसाठी कल्पनेतील दृश्याला मॅच होणारा फोटो शोधावा लागतो. 

डिझाईनसाठी लागणारे हे सारे रॉ मटेरियल गोळा झाल्यानंतर त्यांची मांडणी करणे म्हणजे लेआऊट करणे. त्याला  कंपोझिशन असेही म्हणतात. या साऱ्या उठाठेवीनंतर जे ग्राफिक डिझाईन बनतं  त्याला आपण क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाईन म्हणू शकतो. 

कोर्स मटेरियल :
ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी तुमच्याजवळ नेहमी असायला हवं एक स्केचपॅड आणि पेन्सिल. दररोज तुम्ही जे काही अनुभवता किंवा जे काही शिकता ते लिहिण्यासाठी एक नोटबुक, कॅमेरा (मोबाईल मधील वापरला तरी चालेल.), कोरल ड्रॉ, फोटोशॉप इन्स्टॉल केलेला आणि  इंटरनेट कनेक्शन असलेला लॅपटॉप किंवा पीसी. किमान एवढं कोर्स मटेरियल असायला हवं म्हणजे ग्राफिक डिझाईन शिकायला सुरुवात करता येईल.  

आधुनिक प्रॅक्टिकल शिक्षण पद्धती:
आधुनिक शिक्षण पद्धती कशी असायला हवी यावर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ई.स. 2000 ते 2010 पर्यंत शिक्षण तज्ज्ञांच्या अधिवेशनांमध्ये नुसती चर्चा सुरु होती, स्थानिक पातळीवर का होईना पण त्या वेळी आम्ही या लर्निंग आऊटकम संकल्पनेचा वापर करायला सुरुवात केली होती. योगायोग असेल कदाचित पण 17 वर्षांपूर्वीपासून आम्ही ज्या पद्धतीने शिकवत होतो त्याच शिक्षण पद्धतीचा त्या शिक्षण तज्ज्ञांनी निष्कर्ष काढला. आणि त्या संकल्पनेला लर्निंग आऊटकम असे नाव दिले. आम्ही स्थानिक पातळीवर छोट्या प्रमाणात आणि मराठीत शिकवत होतो म्हणून भले आमची दाखल तेंव्हा कुणी घेतली नसेल पण आम्ही जे शिकवत होतो ते योग्यच होते. आणि हमखास विद्यार्थ्यांचे करिअर घडविणारे होते. हे सिद्ध झाले आहे. आणि हाच सिद्ध झालेला अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती आम्ही आता ‘ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर, पुणे’ या ऑटोनॉमस संस्थेमार्फत ऑनलाईन / ऑफलाईन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.

Scroll to Top