ग्राफिक डिझाईनमध्ये शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कलेची दृष्टी आणि नाविन्याची आवड असेल तर प्रिंट मीडियाबरोबर वेब मीडियामध्येही खूप संधी आहेत. ग्राफिक डिझाईनरला नेमक्या  किती गोष्टी शिकायच्या असतात याला काही मर्यादा नसतात. जेवढे शिकाल तेवढे कमीच आहे. ग्राफिक डिझाईन हे अनेक गोष्टींचे मिश्रण असते. प्रत्येक डिझाईनमागे एक विचार असतो. एक कल्पना असते, तर्क असतो, कौशल्य असते, अंदाज असतो, आणि शेवटी त्या डिझाईनचा काहीतरी परिणाम असतो. कल्पनेला विषयांचे बंधन नसते. ह्या साऱ्या गोष्टी ग्राफिक डिझाईनर हळू हळू शिकत असतो. ग्राफिक डिझाईनच्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. गोष्ट कितीही छोटी असो किंवा मोठी. तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे. कारण कोणत्या गोष्टीचा कोणत्या डिझाईनला कधी उपयॊग होईल हे सांगता येत नाही. तेंव्हा जास्तीत जास्त असे वैचारिक रॉ मटेरियल गोळा करायला शिकले पाहिजे. असो, ह्या खूप पुढच्या गोष्टी आहेत. पण ह्या क्षेत्रात ढोबळ मानाने ज्या ज्या गोष्टी येतात त्यांचा परिचय मी करून देतोय. ज्याचा उपयोग तुम्हाला ग्राफिक डिझाइनमध्ये करिअर करण्यासाठी नक्कीच होईल. 

शिकण्याचा क्रम :

ग्राफिक डिझाईन शिकण्याचा क्रम आणि प्रत्यक्षात डिझाईन बनविण्याचा क्रम परस्पर विरोधी आहेत. ते कसं पाहा. प्रत्यक्षात जेंव्हा तुम्हाला ग्राफिक डिझाईन बनवायचं असतं तेंव्हा प्रथम विचार करावा लागतो, त्यानंतर एखादी कल्पना सुचावी  लागते, आणि त्यानुसार डिझाइनमध्ये वापरण्यासाठी रॉ मटेरियल गोळा करायचे असते. जसे फोटो मिळवणे, मजकूर लिहिणे, त्यानंतर कच्चे स्केच बनवायचं म्हणजे साधारण गोळा केलेल्या रॉ मटेरिअलची मांडणी / रचना कशी असावी हे ठरवायचं. त्यानंतर विषयानुरूप रंगसंगतीचा विचार करायचा आणि सर्वात शेवटी  कॉम्प्युटर सुरु करून डिझाईनला सुरुवात करायची. म्हणजे बघा विषयानुरूप ग्राफिक डिझाईनची संकल्पना फायनल झाली कि शेवटी कॉम्प्युटरवर डिझाईन सुरु करायचं असतं. ग्राफिक डिझाईनसाठी एखादी कल्पना कधीकधी पटकन सुचते तर कधीकधी ती सुचायला काही तास, दिवस किंवा काही आठवडेही लागतात. ग्राफिक डिझाईनची हे जे कल्पना सुचणं आहे ते खरं ग्राफिक डिझाईन आहे. तिथून पुढे कॉम्प्युटरवर जे करायचं असतं, सुचलेली एखादी कल्पना दृष्य रूपात आणायची असते त्यासाठी कोरल ड्रॉ, इलस्ट्रेटर, फोटोशॉप, इन डिझाईनसारखी सॉफ्टवेअर्स शिकावी लागतात. कल्पना सुचते कशी हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी काही सवयी लावून घ्यायच्या असतात त्याबद्दल मी पुढे लिहिलेच  आहे.  

सॉफ्टवेअर्स : व्हेक्टर आणि रास्टर :

सर्वात प्रथम हे समजून घ्या कि ग्राफिक डिझाईनमध्ये फक्त दोनच प्रकारचे ग्राफिक ऑब्जेक्ट असतात एक व्हेक्टर ग्राफिक ऑब्जेक्ट आणि दुसरा रास्टर ग्राफिक ऑब्जेक्ट. ह्या दोन ग्राफिक ऑब्जेक्टससाठी दोन वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरतात, मुख्यत्वे इलस्ट्रेटर किंवा कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर व्हेक्टर ग्राफिक ड्रॉईंगसाठी आणि फोटोशॉप हे सॉफ्टवेअर रास्टर ग्राफिकसाठी वापरतात. व्हेक्टर आणि रास्टर ऑब्जेक्टस  मिळून ग्राफिक डिझाईन बनत असल्यामुळे एकाच डिझाईनसाठी किमान ही दोन सॉफ्टवेअर्स वापरावीच लागतात. प्रिंट मीडियासाठी किमान ही दोन सॉफ्टवेअर्स सुरुवातीला शिकायलाच हवीत. त्यानंतर गरजेनुसार इलस्ट्रेटर, इन डिझाईन आदी सॉफ्टवेअर्स तुम्ही शिकू शकता. या सर्व अभ्यासविषयांचा उपयोग अर्थातच वेब डिझाईन, ब्लॉगिंग, सोशल नेटवर्किंग आणि डिजिटल मार्केटिंगसाठीही होतो. ते आपण नंतर पाहणार आहोत. 

ही झाली सुरुवात. नियमित सराव करून यामध्ये प्राविण्य मिळवता येते. हे सर्व करीत असताना येणाऱ्या तुमच्या कोणत्याही शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही आहोतच. प्रिंट मीडियासाठी ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर हमखास नोकरी तर मिळतेच पण तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसायही सुरु करता येतो. पण आणखी रुबाबात नोकरी मिळविण्यासाठी किंवा व्यवसाय वृद्धी करण्यासाठी थोडं अधिक शिकून तुम्ही तुमच्या नोकरी/व्यवसायाच्या सीमा वाढवू शकता. त्यासाठी ग्राफिक डिझाईनचा बेस असलेल्या आणखी काही गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. त्यामध्ये वेब डिझाईन, ब्लॉगिंग, ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, सोशल मिडिया, ऑडिओ / व्हिडीओ व्हिज्युअल्स आदी विषयांचा समावेश आहे. नोकरीमध्ये तुमचे महत्व वाढविण्यासाठी किंवा तुमच्या व्यवसायाचे अस्तित्व टिकविण्यासाठी तसेच तुमच्या कस्टमरच्या व्यवसायवृद्धीसाठी ह्या गोष्टी शिकायलाच हव्यात. म्हणून पुढे जाऊन ग्राफिक डिझाईनरला आणखी काय शिकायला हवं ते पाहू.  

वेबसाईट बनविणे :

स्टॅटिक आणि डायनॅमिक वेबसाईट बनविता येणे हा एक अत्यंत महत्वाचा अभ्यास विषय आहे. वर्षानुवर्षे नुसत्या कोडिंगमध्ये डोके फोडून घेण्यापेक्षा थोड्या तार्किक अभ्यासाने वर्डप्रेस सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रोफेशनल वेबसाईट कशी बनवायची हे एक स्किल आहे. सेल्फ स्टडी केलेल्या विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता डिग्री करूनही विद्यार्थी  स्टार्ट टू एन्ड साधी स्टॅटिक वेबसाईट  बनवू शकत नाही. ही आजची कटू स्थिती आहे. कारणे अनेक असतील पण ग्राफिक डिझाईनचे अज्ञान हे एक महत्वाचे कारण आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणत्याही फिल्ड मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला त्याची ओळख बनविण्यासाठी वेब ग्राफिक्सची गरज आहे. आणि नोकरी / व्यवसायासाठी ही ऑनलाईन ओळख अत्यंत महत्वाची आहे. म्हणून नोकरी व्यवसायाच्या भाऊगर्दीत स्वतःला प्रकट करण्यासाठी तुमचे ऑनलाईन अस्तित्व असणे ही काळाची गरज आहे. हे ऑनलाईन अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्टार्ट टू एन्ड म्हणजे डोमेन रजिस्ट्रेशनपासून ते होस्टिंगपर्यंतचे ज्ञान असणे गरजेचे आहे. यासाठी वेब ग्राफिक डिझाईनसह आणखी वेगळा अभ्यास करावा लागतो. 

ब्लॉगिंग :

केवळ नोकरी / व्यवसायातच नव्हे, तर शिकत असतानाच स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःचे प्रमोशन करण्याची गरज असते. आणि त्यासाठी ब्लॉगिंगची खूप मोठी मदत होते. ज्याचा उपयोग तुमचे ऑनलाईन प्रोफाईल स्ट्रॉंग बनण्यासाठी होतो. तुमचे परफेक्ट ऑनलाईन प्रोफाईल हे कागदी सर्टिफिकेटपेक्षा खूप मोलाचे आणि नोकरी मिळण्यासाठी किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी उपयुक्त असते. पण हे दुसऱ्याकडून प्रोजेक्ट करून सबमिट करण्याइतके सोपे मुळीच नसते. त्यासाठी तुम्ही जे शिकत असता त्याचा किंवा संबंधीत तुमच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास असावा लागतो. ब्लॉगिंग हा आमच्या अभ्यासक्रमातील एक महत्वाचा विषय आहे. 

सोशल नेटवर्किंग :

फेसबुक, ट्विटर, युट्युब, इंस्टाग्राम, लिंक्ड इन सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर नेहमी लुडबुड करून लोकांच्या नजरेत राहण्यासाठी स्वतःला प्रमोट करण्याचा नियमित प्रयत्न करायला हवा. त्यामुळे तुम्ही, तुमचे काम, तुमचे विचार, तुमचा अभ्यास याची जगाला ओळख होते. पर्यायाने नोकरी मिळण्यासाठी तसेच स्वतःच्या व्यवसायातही ही अशी ऑनलाईन लुडबुड खूप उपयोगाची आहे. फेसबुकवर स्वतःचे नुसते फोटो अपलोड करून बिनकामाची वाहवा मिळविण्यापेक्षा तुमच्या अभ्यासासंबंधित एखादे वैचारिक पेज तयार करून ते पब्लिश करावे. आणि नियमित अपडेट करीत जावे. म्हणजे लोकांना तुमच्या ज्ञानाचे दर्शन घडेल. साहजिकच तुमची मार्केट व्हॅल्यू वाढेल. जिचा उपयोग नोकरी मिळण्यासाठी / स्वतःच्या व्यवसायासाठी नक्कीच होतो. हे सारे आम्ही आमच्या ऍडव्हान्स अभ्यासक्रमात घेतले आहे. 

सोशल नेटवर्किंगमध्ये फुकटात स्वतःचे व्हिडीओ चॅनल सुरु करण्यासाठी युट्युबचा प्लॅटफॉर्म आहे. युट्युबवर उपयोगाचे, बिनउपयोगाचे अनेक प्रकारचे व्हिडीओज असतात. ते फक्त पाहण्यात वेळ घालविण्यापेक्षा तुम्ही तुमचे स्वतःचे फ्रीमध्ये एक युट्युब चॅनल तयार करू शकता. आणि त्याद्वारे तुमचा अभ्यास, तुमची कला, तुमचे कौशल्य जगाला दाखवू शकता. त्यामुळे साहजिकच तुमची सोशल व्हॅल्यू वाढणार आहे. आणि अर्थातच त्याचा उपयोग तुमच्या नोकरी / व्यवसायासाठी होणार आहे. लिंक्ड इन, ट्विटर, इंस्टाग्राम मध्येही स्वतःची ओळख दाखवून देण्यासाठी खूप संधी आहेत. स्वतःला प्रेझेंट करणं हे आजच्या इतकं सोपं पूर्वी कधीच नव्हतं. त्यामुळे या संधीचा फायदा घ्यायला शिका. त्यासाठी जे शिकायला पाहिजे ते सारे शिकवायला आम्ही तयारच आहोत. एखादा व्हिडीओ बनवायचा असेल तर स्क्रिप्ट तयार करणे, स्टोरीबोर्ड तयार करणे, त्याप्रमाणे व्हिडीओ शूटिंग, अनिमेशन करणे, व्हिडीओ एडिटिंग, डबिंग करणे, व्हॉइस ओव्हर रेकॉर्डिंग, साऊंड एडिटिंग या साऱ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. हे सारे एकत्र करून एक फायनल व्हिडीओ बनविणे म्हणजे ती एक ग्राफिक कलाकृतीच असते. व्हिडीओ एडिटिंगची बरीच सॉफ्टवेअर्स नेटवर फ्री मिळतात. पण त्याचा उपयोग करून तुमचे कौशल्य दाखविण्याची तुमची इच्छा हवी. तसे प्रयत्न हवेत. नवनवीन शिकण्याची आवड असायला हवी.
सर्टिफिकेटच्या सुरळ्या घेऊन नोकरीसाठी उन्हातान्हात रांगेत उभे राहण्याऐवजी कंपन्यांनी तुमचा ऑनलाईन पोर्टफोलिओ पाहून नोकरी देतो म्हणून तुमच्याकडे यावे असे वाटत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजेत. आणि हे सारे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून करवून घेतो. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top