ग्राफिक डिझाईनरच्या सहा नैसर्गिक सवयी : 

 

     ग्राफिक डिझाईनची निर्मिती हा दैनंदिन जीवनातील एक नैसर्गिक भाग आहे. त्यामध्ये नवीन काहीच नसतं. ग्राफिक डिझाईनसाठी जे लागतं, ते सारं तुमच्या जवळच असतं. तुमच्या जाणिवेत असतं, तुमच्या नेणिवेत असतं. तुमच्या अनुभवात असतं. अनुभवातून निर्माण झालेल्या तुमच्या दृष्टीत असतं. ग्राफिक आर्टच्या संदर्भात कृत्रिम आणि नैसर्गिक या दोन अत्यंत महत्वाच्या संकल्पना आहेत. जरी त्या परस्पर विरोधी संकल्पना असल्या तरी कलाकार ह्या दोन संकल्पनांची सांगड घालत असतो. नैसर्गिक अनेक गोष्टींची नक्कल करून कलाकार त्याला कृत्रिम रूप देतो आणि त्यातून काहीसा किंवा अगदी परफेक्ट नैसर्गिक आभास निर्माण करतो. त्याला आपण कला म्हणतो. कधीकधी नैसर्गिक नसलेल्या पण सत्य भासणाऱ्या (Realistic) किंवा कधी कधी काहीच न समजणाऱ्याही कलाकृती (Abstract) निर्माण होत असतात. ती त्या कलाकाराची काल्पनिक सौंदर्य दृष्टी असते. त्यामध्ये कधी नैसर्गिक सत्याचा भास तर कधी गूढ कल्पनांचे दर्शन होते. पण ती कला पाहणाऱ्यालाही कलात्मक दृष्टी असावी लागते. स्वतः कलाकार असो किंवा एखादी कलाकृती पाहणारा कलारसिक असो. त्याला जी दृष्टी असावी लागते ती दृष्टी म्हणजेच ग्राफिक डिझाईन असते. ग्राफिक डिझाईन हे भाव, भावना, कौशल्य आणि काही विशिष्ट सवयींचे  मिश्रण आहे. चित्रकला, शिल्पकला, अभिनय कला, चित्रपट, संगणकीय कला आदी कला म्हणजे फक्त भास आहे. ते सत्य कधीच नसते. पण तरी सुद्धा त्यासाठी विशिष्ट प्रकारचे कौशल्य लागते. तशी कलात्मक दृष्टी लागते. नाही तर रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंच आहे कि ‘कला म्हणजे एक असत्यच असते, पण त्यातून सत्याचा भास निर्माण होतो.’ ते अगदी खरंच आहे. 
     ग्राफिक डिझाईनमधील करिअर हे पूर्णतः कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित आहे. दररोज काहीतरी नवीन शिकविणारं आणि दररोज काहीतरी नवीन निर्माण करायला लावणारं आहे. ग्राफिक डिझाईनमधील करिअरमध्ये  रोज तेच तेच नसतं. त्यामुळे नाविन्याची आवड असणाऱ्यांना कधी कंटाळा येत नाही. ग्राफिक डिझाईनसाठी सॉफ्टवेअर शिकणं ही साधी गोष्ट आहे पण कला, कल्पना आणि कौशल्य प्राप्त करून ग्राफिक डिझाईनमध्ये करिअरला सुरुवात करण्यासाठी किंबहुना करिअर सुरु झाल्यानंतरही काही सवयी तुम्हाला लावून घेतल्या पाहिजेत. जे समोर दिसतं ते पाहून, म्हणजे पुस्तक वाचून, पाठांतर करून मेरिटमध्ये येणारे ढिगाने आहेत. पण ग्राफिक डिझाईन हे  जे दिसतं त्याच्या पलीकडील पाहून शिकावे लागते. त्यासाठी ग्राफिक डिझाईन ज्या किमान मूलभूत गोष्टींवर आधारित आहे. त्या गोष्टी शिकून आचरणात आणल्या पाहिजेत. ह्या सहा गोष्टी म्हणजे हे सहा मानवी गुणधर्म आहेत यालाच आपण मानवी सवयी म्हणू शकतो. ग्राफिक डिझाईनच्या निर्मितीमागे अनेक नैसर्गिक सवयी असल्या तरी किमान ह्या सहा सवयी हळू हळू लावून घ्या म्हणजे ग्राफिक डिझाईनर होण्याकडे तुमची वाटचाल सुरु होईल.  

1. निरिक्षण (Observation) :

     ग्राफिक डिझाईनमध्ये निरीक्षणाला खूप महत्व आहे. पण समोर जे दिसतं ते नुसतं पाहणं म्हणजे निरीक्षण नव्हे. समोर जे दिसतं, जे घडतं त्याचं बारकाईनं निरीक्षण करून जे तर्क / वितर्क निघतात त्याचा ग्राफिक डिझाईनमध्ये वापर करता येतो. आज केलेल्या निरीक्षणाचा आजच उपयोग होईल असे मुळीच नाही पण पुढे कधी संबंधित ग्राफिक डिझाईनचा विषय आला कि तुमच्या जाणिवेत / नेणिवेत असणारे हे निरीक्षण जागे होतेच. आणि संबंधित ग्राफिक डिझाईनची एखादी भन्नाट कल्पना सुचू शकते. डिझाईनसाठी लागणारी कल्पना कुठे आकाशातून पडत नाही तर तिचा उगम हा निरीक्षणातून मिळालेल्या अनुभवातूनच होतो. जाणिवेत किंवा नेणिवेत साठलेल्या निरीक्षणातूनच होतो. म्हणून ग्राफिक डिझाईनमध्ये सूक्ष्म निरीक्षणाला खूप महत्व आहे. निरीक्षण कुणीही करू शकतं. त्यात अवघड काहीच नाही. सुरुवातीला जाणीवपूर्वक निरीक्षण करा, नंतर हळू हळू त्याची सवय होईल आणि एकदा सवय झाली कि ते नित्याचं होईल. हे निरीक्षण म्हणजे ग्राफिक डिझाईनचे न दिसणारे रॉ मटेरियल असते. 

2. विचार करणे (Thinking) :

     विचार करणे ही ग्राफिक डिझाईनची पहिली स्टेप आहे. विचार करणे ही जन्मजात मानवी सहज वृत्ती आहे, पण ग्राफिक डिझाईनसाठी जाणीवपूर्वक विचार करावा लागतो. ग्राफिक डिझाईन ही एक वैचारिक प्रक्रिया आहे, त्यामुळे पुन्हा मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या दोन विषयांचा अभ्यास करावा लागतो. ग्राफिक डिझाईन हे अनुमानाचे शास्त्र आहे, अनुमानानुसार येणाऱ्या किंवा न येणाऱ्या परिणामाचे शास्त्र आहे. एखादे अनुमान काढण्यासाठी उलट सुलट सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. कोणत्याही प्रॉडक्ट किंवा सेवेची जाहिरात ही सारासार विचार करूनच बनविलेली असते. तेंव्हा विषय कोणताही असो, त्या विषयावर जाणीवपूर्वक विचार करायची सवय लावून घेतली पाहिजे. 

3. लिहिणे (Writing) :

     लिहिणे ही एक कला आहे. म्हणून लेखक हा सुद्धा एक कलाकार असतो. ग्राफिक डिझाईनमध्ये लिखाणाला खूप महत्व आहे. ग्राफिक डिझाईनमध्ये कमी शब्दांची अर्थपूर्ण रचना करावी लागते. त्यामुळे ग्राफिक डिझाइनमध्ये तुम्हाला जे सांगायचे आहे नेमके तेच समोरच्याला समजले पाहिजे. निरीक्षणातून आलेला अनुभव आणि विचार करून काढलेला निष्कर्ष एखाद्या ग्राफिक डिझाईनला जोडून विषयाचे महत्व पटवून देण्यासाठी जी शब्द रचना करावी लागते त्याला कॉपी रायटिंग असे म्हणतात.  असं ग्राफिक डिझाईनसाठी कॉपी रायटिंग करण्यासाठी नियमित लिखाणाची सवय असावी लागते.  कोणताही विषय घेऊन दिवसातून एक तास तरी लिखाणाची सवय करून घ्यायला हवी. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जे झालं ते जरी लिहिलं तरी तुम्हाला लिखाणाची सवय लागण्यास पुरेसं होईल. लिखाणाची आवड निर्माण झाल्यानंतर हळू हळू ग्राफिक डिझाईनच्या विषयानुरूप लिहिणं सोपं वाटेल. तात्पर्य ग्राफिक डिझाईनसाठी लिहिण्याची सवय असायलाच हवी.

4. रेखाटने: (Sketching) :

     चित्रकला हा ग्राफिक डिझाईनमधील एक महत्वाचा विषय आहे. विषयानुरूप ग्राफिक डिझाईनसाठी एखादे चित्र ड्रॉ किंवा पेंट करावे लागते. त्याला इलस्ट्रेशन म्हणतात. ग्राफिक डिझाईनमध्ये कॅलिग्राफी करावी लागते. कॅलिग्राफी हासुद्धा एक स्वतंत्र विषय आहे.  ग्राफिक डिझाईनमध्ये वेगळेपण आणण्यासाठी अशा गोष्टींची  असते. त्यासाठी तुम्ही शंभर टक्के आर्टिस्ट असायला पाहिजे असे नाही. पण आर्टिस्टिक दृष्टी निर्माण होण्यासाठी स्केचेस करण्याची खूप गरज आहे. फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअरमध्ये हल्ली फोटोवरून असे पेंटिंगचे इफेक्ट्स बनविता येतात. कॅलिग्राफी केल्यासारखे वाटणारे रेडिमेड फॉन्ट्सही उपलब्ध आहेत. पण तरीही ही डिजिटल आर्ट मॅन्युअल आर्टची जागा घेऊ शकत आहे. यासाठी नियमित स्केचिस करण्याची गरज असते. ग्राफिक डिझाईन बनविण्यापूर्वी थम्ब स्केचिस बनविण्यासाठीही स्केचिंगचा उपयोग होतो. रोज निदान एखादा ऑब्जेक्ट समोर ठेऊन त्याचे स्केच करण्याचा सराव करा. अशाने वास्तूचे प्रमाण समजण्यास मदत होते. कोणत्याही वस्तूकडे बारकाईने पाहण्याची सवय लागते. आणि एक आर्टिस्टिक दृष्टी तयार होण्यास मदत होते. 

5. ऐकणे (To Listen) :

     ग्राफिक डिझाईनमध्ये वैयक्तिक मतापेक्षा सार्वजनिक मताला अधिक महत्व असते. म्हणून विषयानुरूप पुढच्याला काय म्हणायचे आहे? त्याची काय अपेक्षा आहे  किंवा अनेकांना संबंधित विषयाबद्दल काय वाटते किंवा त्यांची मते काय आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. तुम्ही जे ऐकता ते तुमच्या ग्राफिक डिझाईनचे रॉ मटेरियल असते. तुम्ही जे ऐकता ते गृहीत धरून त्यानुसार तुम्हाला विचार करून संबंधित ग्राफिक डिझाईन बनवावे लागते. म्हणूनच तर रफ व्हिज्युअल्स तयार झाल्यानंतरही त्यामधून एखादे डिझाईन फायनल कारण्याआधी ती रफ व्हिज्युअल्स अनेकांना दाखवून त्याची मते ऐकली जातात.  ऐकणे ही जरी नैसर्गिक गोष्ट असली तरी जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐकण्याची सवय करून घेणं हे ग्राफिक डिझाईनच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. 

6. काल्पनिक दृश्ये पाहणे (Imagination) :

     वरील पाच सवयींचा परिपाक एखादी भन्नाट कल्पना सुचण्यात होतो. डोक्यात काल्पनिक दृष्ये  तयार होण्यात होतो. किंबहुना तशी दृश्ये पाहण्याची सवय तुम्हाला करून घ्यायला हवी. कल्पना करणे ही सुद्धा एक नैसर्गिक गोष्ट आहे. ग्राफिक डिझाईन करण्यासाठी एखादी कल्पना सुचावी लागते असे जे म्हणतात ते हेच. कल्पना सुचल्यानंतर तुम्ही जे डिझाईन बनवत आहात ते कसे दिसायला हवे त्याच्या प्रतिमा दिसू लागतात. सारांश डिझाईनसाठी एखादी कल्पना सुचली कि 80 टक्के डिझाईन झाल्यासारखे असते. त्यानंतर तुमची सृजनशीलता जागी होते. सहजच तुमचा हात पेन्सिलकडे जातो आणि कल्पनेतील दृष्यांची स्केचेस सुरु होतात. डिझाईनमधील मजकुर लिहायला सुरु होते. रंगसंगती ठरवली जाते. डिझाईनसाठी कल्पनेतील दृश्याला मॅच होणारा फोटो शोधावा लागतो. किंवा डिझाईनसाठी योग्य अशी फोटोग्राफी करावी लागते.

     डिझाईनसाठी लागणारे हे सारे रॉ मटेरियल गोळा झाल्यानंतर त्यांची मांडणी करणे म्हणजे लेआऊट करणे. त्याला  कंपोझिशन असेही म्हणतात. या साऱ्या उठाठेवीनंतर जी रचना बनते, त्या रचनेला आपण ग्राफिक डिझाईन म्हणतो.

2 thoughts on “कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित : ग्राफिक डिझाईनमधील करिअर – 06”

Leave a Reply to Pranali Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top