नावात काय आहे? असं शेक्सपिअरने म्हटले असले तरी मी माझ्या बुद्धीनुसार जेंव्हा विचार करतो तेंव्हा हा प्रश्न शेवटी अनुत्तरीतच राहतो. कारण नावात खूप काही असतं आणि नावात खूप काही नसतंही. ही दोन्ही उत्तरे बरोबर वाटतात आणि थोडा विचार केला तरी ही उत्तरे पटतातही. मला वाटतं जेंव्हा एखाद्या प्रश्नाचं समाधानकारक एकच ठोस उत्तर मिळत नाही तेंव्हा तो प्रश्न वर्षानुवर्षे पुढे सरकत राहतो. जो तो आपापल्या परीने उत्तर देतो कारण त्या प्रश्नाचे मनाला पटणारे एकच ठोस उत्तर कोणी देऊ शकत नाही. नाव ही फक्त ओळख आहे असे मला वाटते. म्हणूनच तर प्रत्येक व्यक्तीला नाव असते, घराला नाव असते, गल्लीला नाव असते, रोडला नाव असते. खेड्याला, शहराला नाव असते. वस्तूला नाव असते, खाद्य पदार्थाला नाव असते. एखादी कंपनी किंवा संस्था सुरू करायची म्हटले कि अगोदर नावाचा विचार केला जातो. थोडक्यात एखादी गोष्ट ओळखण्यासाठी त्याला नाव द्यावे लागते. झाडे, पशु, पक्षी, नदी, फळे, फुले, भाज्या, शरीराचे अवयव – हात, पाय, नाक, डोळे ही नावे फार पूर्वी कुणीतरी ठरवूनच ठेवली असावीत. हवा, आवाज, सुगंध, दुर्गंध, भाव, भावना, बुद्धी हीसुद्धा अस्तित्वात असलेली पण न दिसणारी नावेच आहेत. देव, दानव, भूत, पिशाच्च प्रत्यक्षात काय आहे हे माहित नसले तरी त्यालाही नाव आहेच. शिवाजी महाराज म्हटले कि त्या नावाची जादू काय आहे ते आजही समजते. मग नावात काय नाही असे म्हणण्याचे धाडस कोण करेल. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक, ऐतिहासिक आदी सर्वच गोष्टींना नावे आहेत. थोडक्यात निसर्गातील प्रत्येक घटकाला नाव आहे. डोळ्याला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या पण जाणवणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नाव आहे. आणि म्हणूनच नावाचा उच्चार केला कि त्या नावाच्या गुणधर्मासहित त्याचे चित्र, त्याचा इतिहास, वर्तमान डोळ्यासमोर उभा राहतो. मी अस्तित्वात राहणार नाही. किंवा मी निर्माण केलेली कोणतीही गोष्ट शाश्वत आणि टिकावू नाही याची कल्पना प्रत्येकाला असते. आणि म्हणूनच माझे किंवा माझ्या निर्मितीचे निदान नाव तरी राहावे ही प्रामाणिक इच्छा सर्वांचीच असते. या इच्छेमागे स्वार्थच असतो, पण प्रत्यक्षात त्याला काहीच मिळत नाही कारण तो मृत्यूनंतरच्या अपेक्षेमधील काल्पनिक स्वार्थ असतो. जिवंत असतानासुद्धा नाव माझे, सारे माझे आहे म्हणणारेही भ्रमात जगत असतात. सारे माझे आहे हि एक समजूत आहे. सत्य नाही. वंशाला दिवा पाहिजे कारण माझे नाव राहिले पाहिजे हा सुद्धा भ्रमच आहे. खरे तर आपले जीवन हाच एक भ्रम आहे हे योग-वशिष्ठ वाचल्यावर समजून येते. असो, नावात काय आहे? हे मी सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. जगात काहीही शाश्वत नसले तरी त्या सर्व अशाश्वत गोष्टींचे नाव मात्र निश्चितच शाश्वत आहे हे मान्य करायलाच पाहिजे. कारण नाव टिकून राहते. तिथे चांगले / वाईट भेद नाही.
शेक्सपिअरने नावात काय आहे? हे ज्या भावनेने म्हटले असेल ते बरोबरच आहे. मला तरी पटलंय. कारण नावापेक्षा खूप अधिक कर्मात असते. कर्म काहीतरी करण्यात असतं. कर्म काहीतरी भोगण्यात असतं. काहीतरी ठरवायचं आणि त्यानुसार ठरवलेले साध्य करण्यासाठी कर्म करीत राहायचं. पण जरी नावात काही नसले तरी ते कर्म ओळखण्यासाठी त्या कर्माला काहीतरी नाव ठेवावे लागते. कर्म चांगले / वाईट, कर्माची फळे गोड / कडू कशीही असू शकतात. कर्माचा नावाशी काही संबंध नसतो तरीसुद्धा कर्म चुकले कि दोष नावाच्या डोक्यावर बसतो. नाव खराब होते. नाव बदनाम झाले असे म्हणतात. खरे तर त्या नावाचा काय दोष? एखादा पदार्थ खाताना चांगला वाटतो. तेंव्हा त्या पदार्थाचे नाव माहित असले काय किंवा नसले काय. नावात काय आहे? जे आहे ते त्या पदार्थाच्या चवीत आहे. कोण आहे, त्याचे नाव काय? किंवा काय आहे, त्याचे नाव काय? नावाचा काय संबंध? चवीत आनंद आहे. चवीत समाधान आहे हे महत्वाचं. इथे नावात काही नसते हे पटते. म्हणून नावात काय आहे? हे शेक्सपिअरचे बरोबर आहे. गुगल डॉट कॉम डोमेन रजिस्टर करताना चुकलेले होते. त्यांना रजिस्टर करायचे होते एक रजिस्टर झाले दुसरेच. जर नावातच सारे असते तर ते नाव त्यांनी तेंव्हाच बदलले असते. यावरून नावात काही नसते हे सिद्ध होते. कर्माने नावाला प्रसिद्धी मिळते. म्हणजेच कर्माची ओळख नावातून होते. म्हणून कोणत्याही कर्माला नाव असले पाहिजे. तेंव्हा नाव काहीही असुदे . कर्म चांगले केले कि नाव चांगले होतेच. पण ज्याचे आपण नाव ठेवतो त्याचे कर्म कसे होणार आहे हे नंतर कळत असते. म्हणून आज नाव कितीही चांगले ठेवले तर ते उद्या मोठे होण्यासाठी, नावारूपाला येण्यासाठी चांगल्या कर्माची गरज असते. हेच खरं आहे.
आर्टेक डिजिटलच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही ग्राफिक डिझाईन शिकविण्याचे जे कर्म केले, हमखास विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे जे काम केले ते वेगळ्या नावाने ऍटोनॉमस संस्थेच्या माध्यमातून करावे असे वाटले. म्हणून आम्ही काही समविचारी मंडळी एकत्र येऊन फक्त ग्राफिक डिझाईनचे व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन करण्याचे ठरवले. पण जेंव्हा त्या संस्थेला नाव काय द्यायचे हा विषय आला. तेंव्हा पासून माझ्या मनात ‘नावात काय आहे?’ हा शेक्सपिअरचा अर्थपूर्ण प्रश्न सतत घोळू लागला. त्यातून मनात आलेल्या विचारांचे मी माझ्या बुद्धीप्रमाणे स्पष्टीकरण केले. संस्थेच्या नावाविषयी खूप विचार केल्यानंतर मुख्य विषयाला डायरेक्ट हात घालणारे नाव फायनल केले.
‘ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, पुणे’
नाव फायनल झाले, संस्था नोंदणीचा अर्ज केला. मंजूर झाला आणि गेल्या वर्षी संस्था नोंदणी प्रमाणपत्र मिळाले.
बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार स्टुडन्ट लर्निंग आऊटकम संकल्पनेवर आधारित ग्राफिक डिझाईनचे ऑनलाईन / ऑफलाईन व्यावसायिक प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचं करिअर घडविणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नावात काय आहे? सर अनेक दिवस माझाही गोंधळ होत होता, हे वाचल्यावर शंका दूर झाल्या